औरंगाबाद मनपा निवडणुकीचे काम करणे हा न्यायालयाचा अवमान नव्हे, मनपा आयुक्तांचे स्पष्टीकरण!

astik kumar, amc

औरंगाबाद : औरंगाबाद मनपा निवडणुकीसाठी कच्चा आराखडा तयार करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले असले तरी मतदार यादी, समिती तयार करणे, कच्चा आराखडा तयार करणे हा अभ्यासाचा भाग आहे. नियमात आहे तेवढेच काम राज्य शासन आणि आयोगाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. यातून न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या वॉर्ड आरक्षणावर आक्षेप घेणारी याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी असतांना देखील राज्य सरकारने आगामी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. यासंदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील शुभम खोचे यांनी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती. राज्य सरकारने प्रभागाप्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेसाठी ३८ प्रभाग निश्चित करून देण्यात आले आहेत. ११५ वॉर्डाचे प्रत्येकी तीन वॉर्डप्रमाणे ३७ प्रभाग होणार असून एक प्रभाग चार वॉर्डाचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात वॉर्ड आरक्षणाविरोधात याचिका दाखल असली तरी त्याचा या प्रभाग रचनेच्या परिणाम होणार नाही. राज्य सरकार व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेचे कामकाज चालते. त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त संतोष टेंगळे, सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांचा समावेश असल्याचे आयुक्त पांडेय यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या