सिल्लोडच्या कोविड सेंटरचे काम १५ दिवसांत पूर्ण करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश

सिल्लोड : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच तज्ञांनी वर्तवलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि.३ ) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकी नंतर उपजिल्हा रुग्णालय जवळ सुरू असलेल्या कोविड सेंटर कामाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. सिल्लोड येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण करा, असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले आहेत. सिल्लोड येथील कोविड सेंटर मध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बेड असावे, प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा असावी या पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच कोविड सेंटर येथे अत्याधुनिक ऑक्सिजन प्लांट , एक्स्प्रेस लाईन असलेला विद्युत पुरवठा, डॉक्टरांसाठी केबिन, स्वतंत्र पाणी पुरवठा याबाबत वाढीव तरतूद करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सज्ज राहावे यासोबतच सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि सोयगाव येथील शासकीय रुग्णालयात ५ असे १२ व्हेंटिलेटरसाठी तसेच शासनाच्या धोरणानुसार शासनस्तरावर किमान एक हजार रेमडीसिवर इंजेक्शन खरेदीसाठी संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या