पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ; आता कोल्हापुरात उद्यापासून कडक लॉकडाऊन

कोल्हापूर : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक (किराणा, भाजीपाला आदी) वस्तूंच्या खरेदी साठी ठराविक काळात सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता राज्यातील विविध भागांमध्ये स्थानिक प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या लाटेत तुलनेने कमी रुग्ण होते. मात्र, या लाटेत कोरोना रुग्णांचा विस्फोट होत असून परिस्थिती गंभीर होत आहे. यामुळे, सातारा, सांगली पाठोपाठ आता कोल्हापुरात देखील दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

याबाबत, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्या 5 मे दुपारपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली असून पुढचे 10 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

गोकुळच्या मतमोजणीस सुरुवात –

दरम्यान, जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घौडदौड सुरु आहे. तर, सत्ताधारी महाडिक-पी एन पाटील यांच्या राजर्षी शाहू आघाडीने देखील आपलं खातं उघडलं आहे.

महत्वाच्या बातम्या