जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकरांवर गुन्हा दाखल

jitndra jagtap and dipak mankar

पुणे: जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर , बांधकाम व्यवसायिक सुधीर कर्नाटकी, यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप यांनी काल हडपसर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या केली होती.

रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याच कळतय. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहित आपल्या मृत्यूस दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी तसेच विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. लोहमार्ग पोलिसांनी सुसाईड नोट तसेच इतर गोष्टींचा तपास करत गुन्हा दाखल केला आहे.

दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. पुण्याच्या राजकारणात बडे प्रस्त असणारे दीपक मानकर यांची आजवरची कारकीर्द अनेकवेळा वादात सापडली आहे.

दरम्यान, जितेंद्र जगताप हे आपल्याला एका जागेवरून पैसे मागत होते, पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचे पत्र मानकर यांनी १ जून रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात दिल्याची माहिती समोर आली आहे.