राहुल गांधीविरोधात पुण्यात तक्रार दाखल

bjp youth

मुंबई: जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. आता पुण्यातही भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष राम सातपुते यांनी डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

यावेळी भाजपा कोथरूड युवा मोर्चा सरचिटणीस सचिन फोलाने, राजे शिवराय प्रतिष्ठानचे, महेश पवळे, शिवरुद्र प्रतिष्ठानचे राहुल पाखरे व सागर काळे उपस्थित होते.

वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेवर राहुल यांनी ट्विटरवर भाष्य करून एक व्हिडीओ अपलोड केला होता. बाल हक्क कायद्यानुसार हे उल्लंघन झाले असल्याची तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असतानाही अशा प्रकारचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो प्रसारित करणे गुन्हा असल्याचे बाल हक्क आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना राज्य बालहक्क आयोगाने बजावलेल्या नोटीसबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, जळगावमधील त्या मुलांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता, माध्यमांनीही तो दाखवला होता. मुळ विषयापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधींना अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

यातील कायदेशीर बाबी तपासून आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करू. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीय, गरीबांवर अन्याय वाढले आहेत, त्याचे ताजे उदाहरण जळगावमधील मुलांवरील अत्याचाराचे आहे. यावर कुठली कारवाई केली जात नाही. मग अशा गोष्टींविरोधात आवाज उठवायचा नाही का?अशा गोष्टींविरोधात आवाज उठवला, त्यात कारवाईची मागणी केली तर त्यात गैर काय आहे? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत- अशोक चव्हाण