मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेसची मागणी

पालघर: भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार असून, जशी-जशी निवडणूक जवळ येत आहे, तसं – तसं राजकीय आरोप -प्रत्यारोपला उधाण आलंय. ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजप, शिवसेनेसह कॉग्रेसने देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केल्या जात असून, मुख्यमंत्र्यांविरोधात आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने बुधवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही तक्रार केली. या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन, आमिषे दाखवून आणि निर्णय घोषित करून पदाचा दुरुपयोग व आदर्श आचारसंहितेचा भंग करीत आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे.