TYGR- ओला, उबरला टायगरचे आव्हान

टायगर या कॅब अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅपने मुंबईत आपली सेवा सुरू केली असून यामुळे या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या ओला आणि उबर कंपन्यांना जोरदार स्पर्धा निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.

टायगर ही जगातील पहिली ओम्नी ट्रान्सपोर्ट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. अर्थात यात प्रवासी वाहतुकीसह लॉजिस्टीक, स्पेशालिटी सर्व्हीसेस आणि डिलीव्ही सर्व्हीसेस आदी सेवांचा अंतर्भाव आहे. याची खासियत म्हणजे टायगर अ‍ॅप हे प्रवासी/ग्राहक आणि वाहतूकदारांमधील दुवा म्हणून काम करत असले तरी ते पेमेंटमध्ये हस्तक्षेप करत नाही. अर्थात आपण या अ‍ॅपच्या मदतीने कॅबद्वारे प्रवास केल्यानंतर हव्या त्या पध्दतीने संबंधीत चालकाला प्रवास भाडे अदा करू शकतो. तर टायगर अ‍ॅपला संबंधीत वाहनधारक महिन्याला माफक मूल्य अदा करत असतो. अर्थात या माध्यमातून वाहतूकदार आणि प्रवासी या दोघांचा लाभ होत असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यातच या अ‍ॅपची सेवा आता मुंबईत लाँच करण्यात आली आहे.

टायगरने पहिल्या टप्प्यात मुंबईत पाच हजार कॅबच्या ताफ्यासह पदार्पण केले आहे. मात्र लवकरच कॅबची संख्या दहा हजारावर जाणार असल्याची माहिती या कंपनीतर्फे देण्यात आली आहे. अर्थात यामुळे ओला आणि उबर कंपन्यांना तगडे आव्हान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष करून टायगरच्या माध्यमातून स्वस्त दरात प्रवास होणार असल्याची बाब या दोन्ही कंपन्यांना आव्हान देणारी ठरू शकते. या संदर्भात ‘टायगर’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पोद्दार म्हणाले की, “वाहनांची एक संपूर्ण नवीन यादी काही प्रमोशनल ऑफर्सच्या जोडीने दिली की शहरातील वाहतुकीच्या साधनांची समस्या सुटेल असा समज बहुतेक कॅब समन्वयक कंपन्यांचा असतो. प्रत्यक्षात मात्र, यामुळे केवळ सध्याच्या प्रणालीवरील बोजा वाढतो. आहेत त्याच पायभूत सुविधांमध्ये जास्तीची वाहने आल्यास वाहतुकीवर ताण पडतो. मग चालकांना मिळणारा नफा कमी होऊ लागतो आणि ते तो भाडी वाढवून भरून काढू लागतात.” ते पुढे म्हणाले की, “टीवायजीआरमध्ये आम्ही वाहतुकीच्या साधनांसाठी तसेच प्रवाशांसाठी एक शाश्वत अशी इकोसिस्टम बांधण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावरील गर्दीमुळे वाढणारा वाहतूक खर्च प्रवाशांकडून वसूल करण्याऐवजी आम्ही फारसे न वापरले जाणारे मार्ग शोधून काढतो. शिवाय आमच्या अ‍ॅपद्वारे संबंधितांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. यामध्ये कॅबचालक आणि वाहतुकीशी संबंधित सर्वांचा समावेश होतो. ज्यायोगे ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काम करू शकतात. आमच्या या बिझनेस मॉडेलला यापूर्वीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत टीवायजीआर सुरू झाल्याने आमचे या व्यवसायातील भागीदार आणि प्रवासी दोघांना मोठा लाभ होईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”