कोरोनाच्या कचाट्यात अवकाळी पावसाचे संकट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या !

patil

जुन्नर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गारपीट होत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम हा शेतकऱ्यांना होत असून फळे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जुन्नर येथे 14 मे रोजी झालेल्या गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी पिकांची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

ते म्हणाले की, करोनाच्या महाभयंकर परिस्थितीत शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन शेतीमाल पिकवत आहेत. त्यातच स्थलांतरणामुळे शेतमजुरांची संख्याही कमालीची घटली आहे.त्यामुळे रात्रन्‌दिवस काबाड कष्ट करून शेती फुलविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तर आहेतच; पण आर्थिक दुर्बलताही तीव्र स्वरूपात दिसून येत आहे.

यातच झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्षे, पपई, टोमॅटो, डाळिंब आदींसह भाजीपाला व कांदाचाळींसह पोल्ट्री शेडचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे 500 एकरहून अधिक शेतीची नासाडी झाल्याने या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. या परिस्थितीत ही आर्थिक हानी भरून काढणे येथील शेतकरी वर्गाला शक्‍य होणार नाही.

तालुक्‍यातील आर्थिक स्त्रोत शेती व पर्यटन यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने जुन्नर तालुक्‍यातील येडगाव, नारायणगाव, वारूळवाडी, गणेशनगर, भोरवाडी, बेंदमळा, चौदा नंबर आदी गावांचे शेतीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे तात्काळ पाठवावा. आढळराव यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे याविषयीचा सविस्तर पाठपुरावा करून झालेल्या नुकसानीपोटी योग्य आर्थिक मोबदला मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

IMP