fbpx

भारतीय लष्कर प्रमुखांची जनरल डायरसोबत तुलना, मार्कंडेय काटजू पुन्हा वादात

टीम महाराष्ट्र देशा : मुक्ताफळे उधळून आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन मांडणाऱ्या माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी नवा वाद निर्माण केला आहे. काटजू यांनी भारतीय लष्कर प्रमुखांची तुलना थेट ब्रिटीश अधिकारी जनरल डायरसोबत केली आहे. त्यामुळे काटजू यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

या संतापजनक प्रकारानंतर भारतीय सैन्याच्या विविध अधिकाऱ्यांनी जस्टीस काटजू यांना शेलक्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काटजू यावरच थांबले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून स्वतःचा बचाव करत काश्मिरी जनतेलाही अनेक सल्ले दिले आहेत.

मार्कंडेय काटजू यांनी सुरुवातीला ट्विट करत ही टीका केली होती. यावेळी त्यांनी लिहिलं होतं की, ‘भारतीय लष्कराला शाबासकी..ज्याप्रकारे जनरल डायरने जालियनवाला बागेत आणि लेफ्टनंट कैलीने व्हीएतनाममधील माई लाई येथे केलं अगदी तसंच काश्मीरमध्ये भारतीय सेनेने लोकांना मारण्यास सुरुवात केली आहे. सर्व भारतीय लष्कर अधिकारी आणि जवानांना भारतरत्न दिला पाहिजे’. यानंतर काटजू यांनी फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काश्मिरी जनतेला सल्ले दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

शनिवारी भारतीय लष्कराच्या कारवाईत 3 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी भारतीय जवानांवर हल्ला चढवला. जवान आणि नागरिकांमध्ये काही तास धुमश्चक्री उडाली. या घटनेची तुलना काटजू यांनी थेट जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली आहे.