उरवडे आग प्रकरणात कंपनी मालक जबाबदार ; १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा आदेश

urawade fire

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत काल एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या भीषण आगीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा यांच्याविरोधात भादवि कलम ३०४(२), २८५, २८६ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज त्याला शिवाजीनगर जिल्हा कोर्टात हजर केलं असता 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कंपनीत आठच दिवसांपूर्वी छोटी आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या आगीनंतरच या कंपनीने भविष्यात आग लागू नये याची काळजी घ्यायला हवी होती. मात्र तशी काळजी घेतलेली दिसत नाही. तशी काळजी घेतली गेली असती तर मोठी आग लागून मनुष्यहानी झाली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, पोलीस आणि ससून रुग्णालयाच्या समन्वयाअभावी मृतदेह अजून चार दिवसांनी नातेवाईकांकडे सोपवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP