लस पुरवठ्याबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधा; फडणवीसांचा टोला

uddhav thackrey

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. ही वाढ थांबवण्यासाठी जलद लसीकरण करण्याची गरज असल्याची भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली आहे.

रोज सहा लाख लसी देण्याचं लक्ष्य महाराष्ट्र सरकारने ठेवलं आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेत अडसर येतो आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होत. राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लशींचा साठा असल्याची माहिती आज टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी टोपे यांनी केंद्राकडून लशींचा पुरवठा होत असला तरी त्यात वेग नाही असे म्हणाले होते. टोपेंच्या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. ‘राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लशीचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे’, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते कोरोना लसीकरणासंदर्भात करत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रूपला आवश्यक इतक्या लशींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे’, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे आज केली आहे.

महत्वाच्या बातम्या