चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

crime

औरंगाबाद – शहरातील रात्रीच्या वेळेस होणाऱ्या घरफोडी, चोरी यांरखे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी रात्रगस्तीवर भर दिला आहे. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या पोलीस वाहनांना एका ठिकाणी १० मिनिटांपेक्षा जास्त थांबता येणार नाही असा आदेशच पोलीस आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांकडून कळते.

अलीकडच्या काळात औरंगाबाद शहर आणि परिसरात घरफोड्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आता काही कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्र गस्तीच्या काळात एकाच ठिकाणी वाहने उभी करून काही पोलीस अंमलदार हे तासंनतास उभे राहतात. त्यामुळे हद्दीतील अनेक ठिकाने गस्ती पासून वंचित राहतात. तर अनेक भागात पोलिसांचे रात्री उभे राहण्याची ठिकाण निश्चित आहे. त्यामुळे चोरट्यांना देखील याची कल्पना असू शकते हे नाकारता येत नाही.

चोरीच्या घटनांना आळा बसावा या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रगस्त घालणाऱ्या वाहनांना एकाच ठिकाणी १० मिनिटे पेक्षा जास्त वेळ उभे राहता येणार नाही असा आदेशच दिल्याचे समजते. जर त्यापेक्षा गस्त वाहन जास्त वेळ उभी राहिल्यास त्याच्या कारणांचा खुलासा वरिष्ठांकडे करावा लागणार आहे. या निर्णयामुळे आता रात्रभर पोलिसांची व्हॅन आपल्याला रस्त्यावर फिरताना दिसणार आहे. पोलिसांची उपस्थिती असल्याने चोऱ्या रोखण्यात देखील मदत होईल.

महत्वाच्या बातम्या