सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य

भाजपवरही सोडले टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात भाजप शिवसेना युती जरी असली तरी शिवसेना भाजपवर टीका करण्यात मागे नाही. मग ती सामनाच्या अग्रलेखातून असो किंवा भर सभेत शिवसेनेने आपली शैली जोपासली आहे. राज्यात सध्या भाजप मध्ये पक्षांतर्गत वाद होत आहेत. तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या विरोधात मत व्यक्त केले. एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आणि भाजप वर सुद्धा टीकास्त्र सोडले आहे.

बोलणाऱ्यांचे दिवस ( अग्रलेख सामना )

एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील. महाराष्ट्राला व जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले? गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे, पण लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो कुठेच दिसत नाही.

भारतीय जनता पक्षाच्या दोन पुढाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्या दोन्ही नेत्यांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही हे आम्ही इथे नम्रपणे सांगू इच्छितो. शिवसेना सत्तेत राहून सरकारवर टीका करते असे ज्यांना वाटते त्यांनी भाजपच्या मंत्र्यांची वक्तव्ये गांभीर्याने घ्यायला हवीत. एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर व गिरीश बापट यांनी गेल्या चारेक दिवसांत गमतीशीर विधाने करून लोकांचे मनोरंजन केले आहे. श्री. खडसे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, ‘‘बाबांनो, तुमचं तुम्ही बघा. सरकारच्या भरवशावर राहू नका.’’ खडसे यांनी एक प्रकारे सरकारच्या कार्यक्षमतेवरच सवाल उभा केला आहे. दुसरे एक मंत्री बबनराव लोणीकर यांनी भलतेच काहीतरी सांगून टाकले आहे. ‘‘मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत, आता मी काय करू?’’ अशी हतबलता लोणीकरांनी व्यक्त केली आहे. कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत, त्या पूर्ण करा, लोक संतापले आहेत, असे सांगण्यासाठी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव लोणीकरांकडे गेले व गरीब बिचाऱ्या मंत्र्यांनी स्वतःचेच रडगाणे सुरू केले. खडसे व लोणीकरांची वक्तव्ये म्हणजे राज्याच्या सद्यस्थितीचे

विदारक चित्र
आहे. विकासकामांसाठी पैसा नाही, असे राज्याचे एक मंत्री सांगतात, पण कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन असेल नाहीतर समृद्धी महामार्ग, कर्जबाजारी होऊन सावकारी करण्याचा प्रकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या विनाशाकडे नेत आहे काय? मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांच्या घोषणा रोज सुरू आहेत व त्या घोषणांचा पाऊस पाहिल्यावर राज्याची तिजोरी भरभरून वाहते आहे असेच वाटते, पण फडणवीस सरकारचे मंत्री मात्र काही वेगळेच सांगत आहेत. सरकारातील आणखी एक मंत्री गिरीश बापट यांनी तर नवाच फटाका फोडला. कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांनी बजावले आहे, ‘‘काय मागायचे ते आताच मागून घ्या, नंतरचा काही भरवसा नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे.’’ यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सारवासारव अशी की, बापट यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांचे वक्तव्य हे कार्यकर्त्यांत प्रेरणा आणि जोश निर्माण करण्यासाठी होते. नव्या राजवटीत मराठी भाषेचे वाप्रचार, म्हणी व शब्दांचे अर्थही बदलले जात आहेत. हे असे बोलणे म्हणजे जोश निर्माण करणारे किंवा प्रेरणादायी असेल तर विषयच संपला. बापट यापूर्वीही

वादग्रस्त विधानांमुळे
चर्चेत आले आहेत. आता त्यात आणखी एका वादाची भर त्यांनी टाकली. काय मागायचे असेल तर आताच मागा असे बापट म्हणतात. अर्थात मागून उपयोग नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण जनता मागेल ते द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसेच देत नाहीत असे जर मंत्री असलेले बबनराव लोणीकरच म्हणत असतील तर मंत्र्यांचे बोलणे तरी किती मनावर घ्यायचे, हा प्रश्न निर्माण होतो. हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे. आता एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील. महाराष्ट्राला व जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले? गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे, पण लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो कुठेच दिसत नाही. बुलेट ट्रेननंतर आता २२ हजार कोटींच्या मुंबई-बडोदा एक्प्रेस वेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. हे सर्व करण्यासाठी पैसे आहेत का, असा प्रश्न लोणीकरांच्या मनास टोचत असेल.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...