‘सचिन वाझे प्रकरणात माझीही चौकशी करा आणि दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या’

ajit pawar

पंढरपूर – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नोकरीत पुन्हा घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. याच पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा देखील एका ठिकाणी उल्लेख आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वाझे यांच्या पत्रात केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये दर्शन घोडावट नावाचा व्यक्ती जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचा आहे यांनी माझी भेट घेतली. घोडावत यांनी मला फोन नंबरसह महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखूचा पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. घोडावत यांनी मला सांगितले की हा गुटखा व्यापार कोटींमध्ये आहे. त्यातून मला महिन्याकाठी 100 कोटी जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मी असे काहीही करण्यास नकार दिला होता. माझ्या नकारानंतर घोडावट यांनी मला पुन्हा नोकरी जाण्याची धमकी दिली, असा गौप्यस्फोट सचिन वाझे यांनी पत्रात केला आहे.

सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती.अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावत, या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.

पंढरपुरात बोलताना पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषण देखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही. तरीही माझे नाव का घेतले हे मला माहिती नाही. माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे.

सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :