दिलासा! महापालिकेचे एक हजार ऑक्सिजन बेड्स लवकरच

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यात गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेत महापालिकेने चार कोविड केअर सेंटरमधील एक हजार बेड्सला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. येत्या पंधरा दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सध्यस्थितीत शहरात दररोज एक हजार ते दीड हजार कोरोणा रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये ९० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असले तरीही उर्वरित दहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज भासत आहे. शहरातील खाजगी सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्यांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे त्यांना ही सेवा कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आता महानगरपालिकेने घेतला आहे. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी याबाबत सांगितले की, मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमधील तिनशे बेड्स, एमआयटी कोविड केअर सेंटरमधील तिनशे बेड्स, सिपेट येथील कोविड केअर सेंटरमधील २५० बेड्स, देवगिरी कॉलेजच्या होस्टेलमधील कोविड केअर सेंटरमधील १५० बेड्सला ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. त्यासाठी या चारही कोविड केअर सेंटरमध्ये पाइपलाईन तयार केली जाणार आहे. जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असून येत्या पंधरा दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या