दिलासा! अजिंठा-वेरूळ लेणींसाठी आजपासून वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरु

bus

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून अजिंठा-वेरूळ लेणींसाठी १४ ऑक्टोबरपासून ४५ आसन क्षमतेच्या दोन वातानुकूलित व्होल्व्हो बस सुरू होणार आहेत. पर्यटकांना बसचे ऑनलाइन तिकीट बुक करता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली हि बस सेवा सुरु झाल्याने बाहेरील पर्यटकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच एसटीचे कमी झालेले उत्पन्नदेखील वाढू शकते. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवासी व पर्यटकांची मागणी व संख्या विचारात घेऊन परिवहन महामंडळाने जिल्हा नियोजन व विकास महामंडळाच्या निधीतून दोन व्होल्व्हो बसेस खरेदी केल्या आहेत. मात्र, गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे पर्यटन बससेवा ठप्प होती. मंदिरे, पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून मंदिर, पर्यटनस्थळे खुली झाली आहेत.

त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली असून स्वतंत्र पर्यटन बस पूर्वीप्रमाणे सोडण्याची मागणी होत आहे. त्यानुसार विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दोन वातानुकूलित व्हॉल्व्हो बस १४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक बस धावणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. एसी बसमुळे विदेशी पर्यटकही यातून प्रवास करू शकतील. या बसच्या माध्यमातून एसटी महामंडळाल चांगले उत्पन्न मिळू शकेल.

बस सुटण्याची वेळ व शुल्क

मध्यवर्ती बसस्थानकावरून वेरूळ बस सकाळी ८.३० वाजता तर अजिंठा सकाळी ८.१५ वाजता सुटेल. औरंगाबाद-वेरूळचे भाडे २७५ रुपये, तर औरंगाबाद-अजिंठ्याचे ६९५ रुपये असेल. प्रवाशांना public.msrtcors.com, www.msrtc.gov. in या वेबसाइटवरून आगाऊ तिकीट बुक करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या