मतभेद विसरून एकत्र या, सत्तांतर निश्चित होईल – सिंग

नवी दिल्ली – ‘ मोदी सरकार’ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्तांतर निश्चित असून विरोधकांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावं’, असं आवाहन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने धरणं धरलं असून त्यात मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही सहभागी झाले आहेत.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत.

इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ‘भारत बंद’च्या माध्यमातून केला जात आहे.