होळीनिमित्त घोटाळेबाज नीरव मोदीच्या प्रतीमिचे होणार दहन

यापूर्वी नोटाबंदीचा निर्णय, कर्जबुडव्या विजय मल्ल्या, कसाब यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांचे करण्यात आले आहे दहन

मुंबई: आज होळीनिमित्त मुंबईतील बीडीडी चाळीत घोटाळेबाज नीरव मोदी आणि पीएनबी बँक यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन केले जाणार आहे. वाईट प्रथा, वाईट रुढी यांचे अग्नीत दहन करून चांगल्याच्या निर्मिती व्हावी अशी प्रार्थना होळीच्या दिवशी केली जाते. निरव मोदी यांच्या ५० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.

याआधी नोटाबंदीचा निर्णय, कर्जबुडव्या विजय मल्ल्या, कसाब यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांचे दहनही मुंबईतील बीडीडी चाळीत करण्यात आले आहे. आता यावर्षी हिरेव्यापारी नीरव मोदीची प्रतीकात्मक प्रतिमा उभारण्यात आली असून त्याचे दहन करण्यात येणार आहे.

घोटाळेबाज नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून पळून गेला. या आधी विजय मल्ल्या सुद्धा घोटाळा करून पळून गेला होता. पण मल्ल्या पेक्षाही मोठा कर्जबुडव्या नीरव मोदी ठरला. त्यामुळे त्याच्याबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी निरवच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांनीही नीरव मोदीला साथ दिल्यामुळे पीएनबी बँक प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. देशातील बँकांना फसवणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी जनतेकडून होते आहे.