इंदापूरनंतर आता नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : इंदापूर तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी नाही झाली तरी चालेल पण राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं , याला माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपण इंदापूर ची जागा सोडणार नसल्याचा पवित्रा घेत अजित पवारांच्या वक्तव्याला फारसं महत्व नसल्याचा टोला लगावला होता. इंदापूरच्या या जागेवरून आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असताना आता नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरून सुद्धा या दोन पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू झालं आहे.

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांना चांगलाच चिमटा काढला. खासदार व्हायचे असेल तर राष्ट्रवादीत या अशा शब्दात पिचडांनी डॉ. विखेंना एकप्रकारे उपरोधिक आव्हानच दिले आहे.

दरम्यान , कोणीही उमेदवारी जाहीर केली, तरी नगर दक्षिण लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे व राहणार आहे. आघाडीबाबत व उमेदवाराबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे निर्णय घेतील. कुणाला उमेदवारी करायची असेल तर त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करावा. अस म्हणत मधुकरराव पिचड यांनी सुजय विखे यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

तर हेलिकॉप्टरमध्ये फिरल्याने कुणी खासदार होत नाही आणि तिकीटही मिळत नाही, काँग्रेसनेही उमेदवारी ठरविण्याचे अधिकार स्थानिक किंवा राज्य पातळीवर दिलेले नाहीत, असा टोला पिचड यांनी डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला आहे.