सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

election

उस्मानाबाद : जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांपैकी पहिल्या टप्प्यात ११६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणारे. कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने हिरवा कंदील दाखविल्याने सहकार विभागानेही निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह कळंबच्या जनकल्याण बँक व बहुतांश विविध सहकारी सेवा सोसायटींचा निवडणूक प्रक्रियेत समावेश आहे.

मुदत संपलेल्या राज्यातील ४५ हजारावर सहकारी संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत होत्या. ही मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाल्याने तसेच सरकारलाही एक वर्षापेक्षा जास्त मुदतवाढ देता येत नसल्याने अखेर या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १८ जानेवारीपासून राबविण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहेत.

यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११६ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये महत्वाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जनकल्याण नागरी सहकारी बँक, ७२ विविध कार्यकारी सेवा सोसायट्या व ४१ इतर सहकारी संस्थांचा यामध्ये समावेश आहे. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या आहेत तेथून पुढील प्रक्रिया राबविण्याबाबतही यामध्ये स्पष्ट आदेश दिले आहेत.

अशी असेल पुढील प्रक्रिया
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण ११६ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यामध्ये दि.१८ जानेवारीपासून पुढे ७ दिवस यापूर्वीच्या सभासद याद्यांवर आक्षेप नोंदविण्याची मुदत असेल. तेथून पुढे दोन आठवडे आक्षेपावर सुनावणी घेऊन मतदारयादी अंतिम करणे व साधारणत: १८ फेब्रुवारीपूर्वी या संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणे असा कार्यक्रम राहिल.

महत्वाच्या बातम्या