fbpx

सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री नगरला येणार

टीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची बनवली लोकसभेची जागा म्हणजे नगर दक्षिणची या ठिकाणी राष्ट्रवादीने जागा न सोडल्याने राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपमधून उमेदवारी मिळवली आहे. तर विखेंना तोड देण्यासाठी राष्ट्रवादीने अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली असल्याने ही लढाई तुल्यबळ होणार आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपली सगळी ताकद या जागेसाठी पणाला लावल्याचे चित्र आहे.

अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा अर्ज भरायला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या उपस्थितीत सुजय आपला लोकसभेचा अर्ज भरणार आहेत . अर्ज भरण्याच्या अगोदर जोरदार शक्तीप्रदर्शन करत एक छोटेखानी सभा देखील होणार असल्याचं समजतंय.

मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री गिरीश महाजन, बबनराव पाचपुते आणि राज्यातील भाजपचे बडे नेतेसुद्धा हजेरी लावतील. दरम्यान, नगरची जागा भाजप आणि राष्ट्रवादीने अटीतटीची केलीय. ही लढत देखील तितकीच रंगतदार होईल, यात कुठलीच शंका नाही.