शिवसेनेतील अंतर्गत धुसफूशीतून आमदारावर हल्ला – नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा : ठेकेदारीच्या वादातून शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर हल्ला झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मेट्रोच्या ठेकेदारीच्या वादातून आणि शिवसेनेतील अंतर्गत धुसफूशीतून हा हल्ला झाला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातंही आहे. त्यांना मुंबईचा बिहार करायचा आहे का? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर मुंबईत लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर जनतेचे काय होणार? या प्रकरणातल्या दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी मलिक यांनी केली.

दरम्यान, मुंबईतील अणुशक्तीनगर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीचे वार करत हल्ला करण्यात आला. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये असलेल्या मेट्रो 3 च्या परिसरात हा प्रकार रात्री उशीरा झाला ज्यामध्ये काते बचावले आहेत. त्यांच्या सुरक्षारक्षकांसह अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. मेट्रो कारशेडचे काम शुक्रवारी शिवसैनिकांनी बंद पाडले, तिथून परतत असतानाच कातेंवर हल्ला झाला. याच घटनेवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे आहे तरीही असे हल्ले लोकप्रतिनिधींवर होत आहेत. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा आणि मुंबईचा बिहार करायचा आहे का? असाही प्रश्न मलिक यांनी विचारला.

Gadgil