‘ज्या विकासामागे आपण धावलो, आता त्याने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही’

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात येत असून देशाच्या विकासासह सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, राज्यातील ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारसोबतच आता उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजननिर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्यांचे कौतुक केले आहे.

‘कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात आहे. पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील,’ असं ठाकरे म्हणाले.

यासोबतच, ‘विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे,’ असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या