सिरम : घातपाताची शंका घेणाऱ्यांना संयमाची लस घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

uddhav thackeray

मुंबई : पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटमध्ये दुपारी दोनच्या सुमारास लागलेली आग अटोक्यात आली होती. मोठ्या प्रमाणात आग पसरल्यामुळे कुलिंग ऑपरेशन देखील हाती घेण्यात आले होते. दरम्यान, ७ वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आगीचा भडका उडाला होता. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मुख्य म्हणजे या आगीचा कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पदानावर कुठलाही परिणाम होणार नाही. मांजरी येथील सिरम कंपनीतील नव्या इमारतीमध्ये आग लागली होती. याबाबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. ‘सीरमला लागलेली आग बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगलं काम केले. ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करतात. सीरमच्या आगीवर आग पूर्ण विझल्यानंतर बोलूया’ असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील आगीच्या कारणाबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंना प्रश्न केला असता, ‘सीरमच्या आगीवर घातापाताचा संशय व्यक्त करणाऱ्यांना संयमाची लस टोचण्याची गरज असल्याचा,’ टोला ठाकरेंनी लगावला आहे. तर, उद्या दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यातील सिरमची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या