आघाडीच्या सरकारने तिजो-यांचे सिंचन केले- मुख्यमंत्री

नागपूर : सिंचनाची कमतरता हे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पांना आघाडी सरकारने निधी दिला नाही. त्यांनी फक्त आपल्या तिजो-यांचे सिंचन केले असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल २० हजार कोटीची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीनजी गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. येणाºया कालावधीत या निधीचा पुर्ण विनियोग करून सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था शेतक-यांना दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

काँग्रेसने 2008 साली दिलेली कर्जमाफी ही केवळ 6 हजार कोटी रुपयांची होती व त्यामध्ये विदर्भाला फक्त 1500 कोटी रुपये मिळाले. मात्र, भाजप सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये विदर्भातील शेतक-यांना तब्बल 7 हजार 500 कोटी दिले आहेत. शेवटच्या शेतक-यांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहिल असा दावा फडणवीस यांनी केला.

गांधीग्राम येथे आयोजित या कार्यक्रमादरम्यान शेतक-यांचा मुद्दा पुढे करून शिवसेनेच्या वतीने सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी गोंधळ घालण्याच्या प्रयत्न करणा-या शिवसैनिकांना अटक केली.