हा विजय सर्वसामान्यांच्या विश्वासाचा-मुख्यमंत्री

नागपूर : भारतीय जनता पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांच्या विश्वासाचे द्योतक आहे. पंतप्रधान मोदींचे विकासकारणच देशाला समोर नेऊ शकते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

भाजपच्या आमदारांनी विधानभवन परिसरात गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये भविजय मिळाल्यानंतर जल्लोष साजरा केला. तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी “भारत माता की जय’, “वंदेमातरम’, “जीत गये भाई जीत गये, मोदीसाहब जीत गये’, अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. या विजयोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की, हिमाचल प्रदेशाच्या निमित्ताने 19 वे राज्य भाजपच्या ताब्यात आले आहे. सर्वसामान्य जनता भाजप व नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे. हे निकालाने स्पष्ट झाले आहे.

तब्बल 22 वर्षांनंतरही भाजपने या निवडणुकीत50 टक्के मतदान घेऊन भाजपा लोकप्रिय असल्याचे सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदींना गुजरातच्या सर्वसामान्य जनतेने जो पाठिंबा दिला. त्यातूनच हा विजय मिळाला आहे. कॉंग्रेसने गुजरातमध्ये चांगली बाजी मारली, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जनतेने 50 टक्के मतदान करून जनता भाजपच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.