उपचारांसाठी पर्रीकर ‘एम्स’मध्ये दाखल,काही काळासाठी मुख्यमंत्री पद सोडणार

टीम महाराष्ट्र देशा- स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर काही काळासाठी मुख्यमंत्री पद सोडणार आसल्याची माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेवरून पर्रीकर यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पर्रीकरांची तब्येत पुन्हा बिघडल्यामुळे भारतीय जनता पार्टीची केंद्रीय समिती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गोव्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होतील व पर्यायी नेतृत्वाची व्यवस्था करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.