चूक असेल तर सोडणार नाही, राज ठाकरेंच्या ईडी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा टोला

blank

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीची नोटीस आली आहे. मुंबईतील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ‘ईडी’ने राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी राज यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडल्याने मनसे आक्रमक झाली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.

‘ईडी’ स्वतंत्ररित्या काम करत आहे. त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. ईडीच्या चौकश्या सुरूच असतात. त्यात सूडबुद्धी वगैरे येत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना आलेली नोटीस ही नक्की कशा स्वरुपाची आहे. याबाबत तुमच्या इतकेचं मला माहित आहे. त्यामुळे चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. जर चौकशीत काही गैर सापडले नाही तर ते सोडून देतात. पण चूक असेल तर ती भोगावीच लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या चौकशी बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात टाकले जात आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चाल आहे अशी प्रतिक्रिया मनसेकडून दिली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.