मुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला

टीम महाराष्ट्र देशा : लॉर्डसवर झालेल्या इंग्लंड वि. न्यूझीलंडच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर दोनदा टाय होऊन देखील इंग्लंडने हा सामना सर्वाधिक बाउन्ड्रीजच्या जीवावर जिंकला आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासातील इंग्लंडचा हा विजय ऐतिहासिक तर आहेच पण अविश्वसनीय देखील आहे. इंग्लंडच्या या विजयावर अनेकांनी अभिनंदन केले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत टीम इंग्लंडचे अभिनंदन केले आहे. मात्र अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी चूक केली आहे.

झाल असं की, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन इंग्लंडच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी इंग्लंड क्रिकेट संघाला ट्विटमध्ये टॅग करण्याऐवजी त्यांनी चुकून इंग्लंड फुटबाॅल संघाला टॅग केलं आहे. @England या ट्विटर हॅंडलला मुख्यमंत्र्यांनी टॅग केलं आहे, मात्र ते फुटबाॅल संघाचे ट्विटर हॅंडल असून @englandcricket हे इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे अधिकृत ट्विटर हॅंडल आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या चुकीनंतर ट्रोलर्सनी चांगलेच ट्रोल केले आहे.