निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल, कोणाची चड्डी उतरते, फडणवीसांचा पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : तिसऱ्या टप्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. मात्र या प्रचार सभांवेळी प्रचाराची पातळी घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी ‘चड्डी’वरुन टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्या चड्डीवरुन तुम्ही बोलत आहात, त्याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, हे विसरु नका. असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांना लगावला आहे.

रविवारी माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस कुर्डूवाडी येथे प्रचार सभेत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी आरएसएस बाबतच्या वक्तव्यावरून पवार यांचा समाचार घेतला.फडणवीस म्हणाले की, “याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात. २३ मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल की, कोणाची चड्डी उतरते”.

काय म्हणाले होते शरद पवार ?
विजयसिंह मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी अकलूजमध्ये झालेल्या सभेत मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली होती. शरद पवार मोहिते पाटलांना म्हणाले होते की, भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?