fbpx

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा तर अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याच्या हस्ते मानाची पूजा

टीम महाराष्ट्र देशा : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर वारकऱ्यांमधून लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी विठ्ठल चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा संपन्न झाली.

भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी…एक एक पाऊल टाकत आता विठ्ठलाचं रुप पाहण्यासाठी आता डोळे आतूर झाले आहे. आज आषाढी असल्यामुळे पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलं आहे. अलोट गर्दी पंढरपुरात झाली आहे. चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. अशी इच्छा घेऊन आज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहे.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठूमाउलीची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडली. तर लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी विठ्ठल चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांना वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पूजेला बसण्याचा मान मिळाला. चव्हाण दांपत्य हे गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करत आहेत.

रात्री सव्वादोन वाजता या महापूजेला सुरवात झाली तर पहाटे ३ वाजता विठूरायाची महापूजा संपन्न झाली. विठूमाऊलीच्या मूर्तीला पंचांमृताने स्नान घालून चंदनाचा लेप लावून महापूजा केली तसेच तुळशीच्या हारांनी मूर्तींना सजवण्यात आले.

महापुजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजेचा मान मिळालेल्या चव्हाण दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. तर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपस्थित आमदार खासदार, मंत्री यांचे सत्कार करण्यात आले. महापूजा संपन्न होताच राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील दुष्काळ दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलं.

विशेष म्हणजे २०१८ ला मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हाभर ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे, एसटी ची तोडफोड झाली. काही मंत्र्याना आंदोलनकर्त्यांनी घेराव ही घातला होता. यामुळे बिघडलेली परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजेसाठी येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.