‘दहशतवाद रोखण्यासाठी सुरक्षा क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहनाचे धोरण आखणार’

मुंबई :  तंत्रज्ञानावर आधारित लढाईतील शत्रूंना पराभूत करण्यासाठी,सकारात्मक अशा घटकांची मोट बांधण्याची गरज आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणाऱ्या सुरक्षा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारे धोरण आखले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र पोलिस दलाच्या 59 व्या स्थापना दिनानिमित्त (रेजींग डे )आयोजित परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पोलीस महासंचालनालयाच्या मुख्यालयात आयोजित या परिसंवादास गृहराज्यमंत्री (ग्रामीण)दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील,पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह  यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, विधिज्ञ, निवृत्त पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

परिसंवादात भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त पोलीस अधिकारी आलोक जोशी,इन्स्टिट्यूट ऑफ कॅाफ्लिक्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजय सहानी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील क्रमांक एकचे पोलीस दल आहे. या दलाने मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील असलेल्या शहरांची सुरक्षा सक्षमपणे हाताळली आहे. शांतता व सुव्यवस्था राखतानाच अनेक दहशतवादी कारवायांना धीरोदत्तपणे वेळीच हाणून पाडले आहे

यापुढे सायबर स्पेस आणि समाज माध्यमांतूनच दहशतवादी कारवायांना उत्तेजन देणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित लढाया लढल्या जातील असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, तंत्रज्ञानावर आधारित कारवायांना तोंड देण्यासाठी, तितक्याच चांगल्या आणि सकारात्मक संकल्पनांनी वेगवेगळ्या प्रणालींवर काम करावे लागेल. अशा घटकांना जोडून घ्यावे लागेल. तंत्रज्ञानातील बदल वेगाने पुढे जात आहेत. त्यांच्याशी एकरुपता राहील, असे धोरण आखावे लागेल. यासाठी संस्थात्मक अशी संरचनाही निर्माण करावी लागेल. याचसाठी आपण आता प्रयत्नशील आहोत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्रणाली वापरणे सुरु केले आहे. अन्य व्यावसायिक क्षेत्रातही नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स सुरु झाली आहेत. अशा स्टार्टअप्सना सुरक्षेच्या क्षेत्रातही संशोधनातून नाविन्यपूर्ण प्रणाली  निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. त्यासाठी निश्चित असे धोरण असावे यासाठी प्रयत्न केले जातील असं देखील ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...