शेतीला पूर्ण वेळ वीज देण्यासाठी रोहित्र सौरऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. राज्य शासनाने या दोन्ही बाबींच्या पुर्ततेसाठी प्राधान्य दिले आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज उपलब्ध करून देण्याचे कार्य शासन करीत आहे. सौऊ ऊर्जेवर आधारित कृषीपंप दिल्यानंतर आता शासन सौर ऊर्जेवर आधारित रोहित्रेच आणत आहे. या संदर्भातील पायलट प्रकल्प सुरु झाला असून तो यशस्वी होत आहे. यामधून पुरेपूर वीज मिळणार असल्यामुळे शेतकरी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

मोर्शी तालुक्यातील ग्रामठुनी येथे जैन फार्मफ्रेश हिन्दूस्तान कोकाकोला कंपनीच्या संत्रा उन्नती प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री यांच्याहस्ते आज करण्यात आले. त्यांनतर जवळच असलेल्या हिवरखेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या संत्रा प्रकल्पाचा सामंजस्य करार झालेला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथील ‘मेक इन इंडिया विक’ मध्ये राज्यातील महत्त्वाकांक्षी तीन प्रकल्पाचे सामंजस्‍य करार करण्यात आले होते. त्यापैकी मोर्शीतील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे प्रत्यक्ष भूमिपूजन करुन आम्ही वचनपूर्ती केली आहे. जैन इरिगेशनने देशात शेती क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. कृषि प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात नाही, परिणामी नैसर्गिक आपत्ती आणि विपणन होत असलेल्या देशांमधील स्थानिक कारणांमुळे शेतमालाचे भाव पडतात. शासनाने कृषि प्रक्रिया उद्योग वाढवण्यावर भर दिला आहे. कृषि प्रक्रिया उद्योगांच्या निर्मितीमुळे बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात आहे, याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत कापसापासून कापडापर्यंतचे मुल्यवर्धीत 12 प्रक्रिया उद्योग सुरु केल्यामुळे 15 ते 20 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ‘ॲपरण’ पार्कमुळे महिलांना रोजगार मिळणार आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे कोकाकोला व जैन फार्मफ्रेश कंपनी संत्रा प्रक्रिया उत्पादनात ब्राझिल व अमेरिकेतून आयात करावा लागणारा गर आता आपल्या मोर्शीत निर्माण होईल. त्यामुळे मोर्शीच्या संत्र्यांचा गर जगभरात या कंपनीच्या माध्यमातून पोहचणार आहे. या उत्पादनाला 100 टक्के देशी स्वरुप प्राप्त होईल. या उत्पादनाची विक्री कोकाकोला जगभरात करेल. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळणार असून ती व्यापारांच्या हातात न राहता शेतकऱ्यांच्या हाती राहील.

हा प्रकल्प पुढील दीड ते दोन वर्षात पूर्ण करण्याचे अनिल जैन यांनी वचन दिले आहे. संत्र्यांचे नवीन वान विकसित केल्यामुळे एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना 50 हजार अधिक उत्पादन मिळणार आहे. फक्त तीन वर्षात या वानास फलधारणा होईल. विदर्भातील अनुशेष तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. कृषि मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कृषि क्षेत्रात आमुलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अशोक रोडे, हरीभाऊ सुखसोडे, नवीन पेठे आदी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार केला. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी झाली पाहिजे. या संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे 50 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण होताच या भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात कायापालट होणार आहे. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील बंद अवस्थेत असलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प महाऑरेंज या संस्थेला पुढील पाच वर्षासाठी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शासन जमिनीची आरोग्य तपासणीसाठी पाच गावांमागे एक प्रयोग शाळा सुरु करणार आहे.

जलसंपदा मंत्री गिरिष महाजन म्हणाले, जैनचे कृषि क्षेत्रातील संशोधन कार्य मोठे आहे. उपलब्ध पाणी साठ्यातून संपन्न शेती करण्याचे कसब जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना मिळवून दिले आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुषेश दूर करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल.

अनिल जैन यांनी प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट करीत शेतकऱ्यांना होणारे लाभ समजून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी विनोद रापतवार यांनी केले.