राहायचं असेल तर मुंडेंसोबत, अन्यथा गरज नाही; मुख्यमंत्र्यांचा मेटेंना निर्वाणीचा इशारा

vinayak mete and devendra fadnavis

बीड: शिवसंग्रामचे नेते आ विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात मुंडे बहिणींना विरोधाची भूमिका घेतली आहे, राज्यामध्ये भाजपचा प्रचार करणार, बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मेटे यांच्या दुट्टपी भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले आहे.

कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी मेटेंना निर्वाणीचा इशारा दिला.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रितम मुंडे, आ. जयदत्ता क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. संगिता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. भीमराव धोंडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे, जातीमुळे कोणी नेता होत नसतो, त्या जातीसाठी कोण काय करतो यावर नेता ठरत असतो. ५० वर्षापासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. मराठा आरक्षणाला मुंडे साहेबांनी जाहीर समर्थन दिले होते. त्यांच्या पश्चात पंकजाताईंनीही पूर्ण पाठींबा दिला. १५ वर्षे तुमची सत्ता होती, तेंव्हा का प्रश्न सोडविला नाही, त्यावेळेस तुम्हाला जात आठवली नाही का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. शरद पवारांना हवेचा अंदाज आल्यानेच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असा टोलाही त्यांनी लगावला.