विजयदादांच्या आशीर्वादानेचं रणजीतदादा भाजपमध्ये – मुख्यमंत्री

blank

टीम महाराष्ट्र देशा : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा झेंडा त्यांच्या हाती देत भाजप प्रवेश दिला आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आणखीन बळ मिळाले आहे. तर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात आज अनेक नेते भाजप विरोधात एकत्र येत आहेत. मात्र ते एकमेकांच्या पायातपाय घालण्याचा प्रयत्न करतात. राज्याचे राजकारण मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही. रणजितसिंह यांनी युवा नेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोहिते पाटील घराणे भाजपशी जोडले जात आहे याचा आनंद होत आहे. तसेच विजयदादांच्या आशीर्वादानेचं रणजीतदादा भाजपमध्ये आले असल्याचं फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने माढाचा खासदार हा भाजपचाच होणार हे निश्चित असल्याचं फडणवीस म्हणाले.
कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने दुष्काळी भागाला न्याय दिला नाही, मात्र सहा जिल्हे आणि ३१ तालुक्यांचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवण्यासाठी मंजुरी दिली, समान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिल्याचं यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.