‘एनआरसी कंपनीचे कामगार आणि रिंगरूटबाधीत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा- एकेकाळी गत वैभव असलेली एनआरसी कंपनी बंद पडल्याने कामगारांची देणी देण्यासंदर्भात स्वतः जातीने लक्ष घालीन. प्रस्तावित रिंगरूट मध्ये अनेक नागरिकांची घरे येत आहेत मात्र कल्याणकरांनी चिंता करू नका. दोन्ही विषयात तातडीने घालून नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोने येथे बोलताना दिले. भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा आयोजित आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामान्याचा उदघाटन सोहळा व व्हॉलीबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोहोने येथे संपन्न झाला.

कल्याणच्या विकासासाठी काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष या विधानसभेवर असते. एनआरसी कामगारांची देणी देण्याबाबत अनेकदा चर्चाही झाली आहे. या मोहोने परिसरात भेट देणारे इतिहासातील राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब आल्यामुळे आता आम्हा कल्याणकरांच्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत. रिंगरूट बाधित नागरिक आणि एनआरसी कामगार यांना न्याय द्यावा असे प्रास्ताविक करत आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले

आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रश्नाला घेऊन पुढे बोलताना NRC कंपनी आणि रिंगरूट बधितांच्या प्रश्नावर भाष्य केले. सरकार एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी आणि रिंगरूट बाधित नागरिकांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासनही दिले. कामगारांच्या हिताचं रक्षण करणे हे देखील महत्वाचे असून त्यानी दिलेल्या निवेदनात स्वतः जातीने लक्ष घालून कश्या प्रकारे हा प्रश्न सोडवून त्यांना न्याय देता येईल यसाठी खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांची बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

सीएम चषक स्पर्धेचे महत्व विषद करताना महाराष्ट्रातील खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे तसेच विविध खेळाला वाव मिळावा व आजची युवापिढी मैदानावर दिसावी या करता सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून 20 लाख खेळाडूंनी विविध स्पर्धेत भाग घेत आपले रजिस्ट्रेशन केले. ही संख्या पन्नास लाखाच्या घरात जाईल असा विश्वास व्यक्त करीत यास्पर्धेला अभूतपूर्व समर्थन मिळाले असल्याचे प्रतिपादन करत आमदार नरेंद्र पवार यांच्या आयोजनाचे कौतुकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शक करताना केले.

यावेळी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेवजी जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार रमेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके, उपमहापौर उपेक्षा भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.