भाजपच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या सभेत गोंधळ केलेलं त्यांना चालेल का ?

पुणे : काल (शनिवार) बारामती दौऱ्यात पाच ते सात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलीस त्यांच्याकडे येत असल्याचे दिसताच त्यांनी तेथून पळ काढला. मात्र या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. अशा बातम्या पसरवल्या जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून पोलिसांनी असा कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज केलेला नाही”, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, “बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का? शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का? असा सवाल उपस्थित केला. तुम्ही देखील आमच्या इथे येऊन सभा घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या सभेत गोंधळ केलेलं त्यांना चालेल का ? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. पायाखालची माती सरकल्यासारखं राष्ट्रवादीचे लोक वागत असून आमच्या शहरात दुसऱ्यांनी सभा घेयची नाही, हे धोरण चुकीचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांना पुढे करून मतं मागितली जात. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यातील दोष राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिसू लागले आहेत. जे द्राक्ष मिळत नाही ते आंबट असतात, अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी उदयनराजे यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला आहे.