खडसे राज्यात की केंद्रात ? मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय भविष्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केले आहे. त्यांनी नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते राज्यात राहणार की केंद्रात हा निर्णय पक्ष घेणार आहे असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात भाजपच्या महाजनादेश यात्रेचाही समावेश आहे. ही यात्रा भुसावळ येथे आली असता मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना खडसे हे राज्यात राहणार की केंद्रात जाणार याबाबतही निर्णय पक्षच घेणार असल्याचे सांगताना केंद्रात जाण्याचा योग सध्या दिसून येत नसल्याचही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याशी शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी ‘आम्ही कुठलाही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडं विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते आहेत. ज्यांनी जगाच्या पाठीवर भारताला एक मजबूत देश म्हणून पुढं आणलंय. त्यांच्या नेतृत्वामुळंच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडं येत आहेत असं विधान केले.