… तर बदलणार गोव्याचे मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अजूनही आजारी आहेत. ते अमेरिकेहून तिस-यांदा वैद्यकीय उपचार घेऊन गोव्यात परतले तरी, त्यांचे आरोग्य त्यांना हवे त्या प्रमाणात साथ देत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री मंगळवारीही मंत्रालयात येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत पूर्णतः सुधारणा होईपर्यंत गोव्यातील सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाऊ शकतो, मुख्यमंत्री म्हणून नवा नेता निवडला जाऊ शकतो, अशी माहिती भाजपाच्या गोटातून मिळत आहे.

पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार

गोवा प्रशासन ठप्प झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीवेळी ही स्थिती आम्हाला मारक ठरेल, अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री गेले अनेक दिवस मंत्रालयात येऊ शकलेले नाहीत. आधी मुख्यमंत्री मुंबईतील इस्पितळात उपचार घेत होते. मग ते आठ दिवस उपचारांसाठी मुंबईहूनच अमेरिकेतील स्लोन केटरींग इस्पितळात गेले होते. गेल्या गुरुवारी मुख्यमंत्री गोव्यात परतले पण त्यांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी सुरूच आहेत. मुख्यमंत्री आजारातून पूर्णतः बरे झालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी घरीच राहणे पसंत केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारातून पूर्ण बरे होऊ द्या व नव्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विविध प्रकल्प राबविण्याची संधी मिळू द्या, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे पणजीत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमावेळी उपस्थित पणजीवासियांसमोर बोलताना म्हणाले. यावेळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हेही उपस्थित होते.