खा. भडानांची पतियाळा हाऊस न्यायालयात केजरीवालांनी मागितली माफी

दिल्ली : मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा कॉंग्रेसचे खासदार अवतार सिंग भडाना यांची पतियाळा हाऊस न्यायालयात लिखित स्वरूपात माफी मागितली. आपल्या सहका-याच्या प्रभावाखाली येऊन अशा प्रकारचे वक्तव्य केले. भडाना यांची प्रतिमा मलीन करण्याचा आपला हेतू नव्हता, असे केजरीवाल यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे. केजरीवाल यांनी २०१४ साली मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भडाना यांनी पतियाळा हाऊस न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यात त्यांनी नुकसान भरपाई म्हणून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ही माफी मागितली. देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्तींमध्ये भडाना यांचा समावेश होत असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर भडाना यांनी केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस बजावत आपले वक्तव्य मागे घेण्याची अथवा माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, केजरीवालांकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने ते न्यायालयात गेले होते.Loading…
Loading...