fbpx

पोस्ट खात्यात क्लार्क भरती परीक्षेसाठी मराठी अनिवार्य करा : मनसे

mns pune

पुणे : पोस्ट ऑफिसमधील क्लार्क पदासाठीच्या नोकर भरती प्रक्रियेमध्ये मराठी उमेदवार हेतू पुरस्सर डावलले जात असल्याचा आरोप करत क्लार्क भरती परीक्षेसाठी मराठी अनिवार्य करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे . मनसेकडून एक पत्रक काढण्यात आलं असून या पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

नेमक काय म्हटलं आहे या पत्रकात ?

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधून होत असलेल्या विविध पदांच्या नोकरभरती प्रक्रियेतून मराठी उमेदवारांना हेतू पुरस्सर डावले जाते. पोस्ट खात्यात सुद्धा हाच प्रकार होताना दिसत आहे.२०११ पर्यंतच्या पोस्टांच्या नोकरभरती परीक्षा या खात्यामार्फत होत होत्या. या परीक्षांना त्याच परीक्षार्थींना बसता येत होते, जे १२ ला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहे. म्हणजेच ज्याचे शिक्षण मराठीतून झाले आहे. २०१२ पर्यंतच्या नोकरभरती प्रक्रियेमध्ये नोकरी मिळण्याचे प्रमाण स्थानिक मराठी उमेदवारांचे प्रमाण जास्त होते. २०१२ ला खाजगी संस्थेकडून परीक्षा घेण्यात आल्या. त्या परीक्षांमध्ये २०१२ आणि २०१४ ला झालेल्या नोकरभरती प्रक्रियेत सर्वच्या सर्व उमेदवार परप्रांतीय भरण्यात आले. या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर या परीक्षा २ ते ३ वेळा घेऊन नोकरभरती करण्यात आली. सदर नोकरभरती प्रक्रियेमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप होता.

२०१५ सालापासून पोस्टाची क्लार्क भरती प्रक्रिया हि एस.एस.सी. Staff Selection commission कडे गेली. परंतु या आगोदरच २०१४ ला सदर भरती प्रक्रियेच्या परीक्षासाठीची मराठी भाषेची अनिवार्यता काढण्यात होती. तसेच पोस्ट खात्यांतर्गतचे रिजिनलचे बंधन काढण्यात आले. यामुळे संपूर्ण भारत भरातील कोणताही उमेदवार कोणत्याही रिजनमध्ये नोकरीसाठी परीक्षा देऊ शकणार होता. सदर परीक्षांनंतर झालेली नोकरभरती हि मराठी मुलांना बाहेरचा रस्ता दाखवणारी ठरली आहे. २०१५ च्या भरती परीक्षेचे रिझल्ट फेब्रुवारी २०१८ मध्ये लागले. यामध्ये अंदाजे ३५३ जागांसाठीची भरती झाली यात फक्त १२ उमेदवार मराठी होते.

नव्याने २०१६ चा निकाल ११/०६/२०१८ रोजी जाहीर झाला आहे. यात देखील अंदाजे ३१८ उमेदवारांची क्लार्क पदासाठीची भरती होणार आहे. यातील फक्त अंदाजे २६ उमेदवार मराठी आहेत. एकंदरीतच पोस्ट ऑफिसमधील क्लार्क पदासाठीच्या नोकर भरती प्रक्रियेमध्ये मराठी उमेदवार हेतू पुरस्सर डावलले जात आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध करीत असून पोस्ट क्लार्क नोकर भरतीसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी अशी मागणी करीत आहे.सदर बाबत पक्षाला लिखित स्वरूपात खुलासा करावा हि विनंती. कळावे,

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

आपला नम्र, अजय शिंदे ( शहराध्यक्ष, मनसे )

1 Comment

Click here to post a comment