fbpx

नाल्याची साफसफाई करून मला फोटो पाठवा; आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना आदेश

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. यानिमित्त ते अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या परिसरात घाण असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा संवाद कार्यक्रमात केली.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ महाविद्यालय गाठून परिसराची पाहणी केली. हा नाला व परिसराची साफसफाई दोन दिवसात करुन मला फोटो पाठवा, असा आदेश ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला. तसेच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आयुक्तांना सुचना देत साफसफाईबाबत अहवाल पाठविण्यास बजावले. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात ग्रीन बेल्ट विकसीत करावा, अशा सुचनाही मंत्री कदम यांनी आयुक्तांना दिल्या.

दरम्यान, युवा संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.