fbpx

भाजप – कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

congress bjp

टीम महाराष्ट्र देशा : नंदुरबार नगरपालिकेत भाजप आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. नगरपालिकेच्या सभेत विषय मांडण्यावरून चाललेल्या वादावादीचे रुपांतर अचानक हातघाईत झाले आणि काँग्रेस, भाजपा नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. यात नगरसेविकेचा पती रक्तबंबाळ झाला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद नोंदवली गेली आहे.

नंदूरबार नगरपालिकेची मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता सभा सुरू झाली. तेव्हा पुढे बसायला मिळावे यावरून भाजपा नगरसेवकांनी मुद्दा उपस्थित केला. नंतर भाजपा नगरसेवक आनंद माळी, निलेश माळी, नगरसेविका संगिता सोनवणे यांनी अजेंड्यावर लोकांच्या कामाशी संबंधीत विषय नसतात, असे म्हणणे लावून धरले. तसेच सर्व भाजपा नगरसेवकांनी आमचे म्हणणे मान्य होईपर्यंत खाली बसणार नाही, अशी भूमिका घेतली.

या गदारोळात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी बसून बोलण्याची विनंती करीत चर्चा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नगरसेवक किरण रघुवंशी आणि भाजपाचे माळी यांच्यात वाद वाढून अचानक खूर्ची फेकणे, धावपळ सुरू होवून दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. नगरपालिका परिसरात क्षणात दंगल सदृश्य वातावरण बनले. पोलिसांनी हलका लाठीमार करून दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवले. दरम्यान, नगरसेविका सोनवणे यांनी त्यांचे केस धरून सभागृहातच मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यांना सोडवायला गेलेले त्यांचे पतीही रक्तबंबाळ झाले.