fbpx

शिवेंद्रराजे, दाढ्या वाढवून अकलेत वाढ होत नसते – उदयनराजे

उदयनराजे भोसले

टीम महाराष्ट्र देशा : आत एक आणि बाहेर एक अशी कधीही भूमिका मी मांडलेली नाही. स्व. दादामहाराज यांच्यापासून आम्ही जनतेबरोबर आहोत आणि जनतेमध्येच आम्ही आमच्या कुटुंबाची स्वप्ने पाहत असतो. तुमच्यासारखे सहकाराखाली संस्था काढून कुणाला देशोधडीला लावलेले नाही. शिवेंद्रराजे, दाढ्या वाढवून अकलेत वाढ होत नसते. त्यासाठी आडात असावे लागते, असा पलटवार खा. उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांच्यावर केला आहे.

दरम्यान, तुमच्या बँका व संस्थांमधील भ्रष्टाचारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्याबद्दल तुम्ही गांधी मैदानावर तुमचे नाक घासणार का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला आहे.

खा. उदयनराजेंनी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मंगळवार तळ्याची स्वच्छता न केल्यामुळे नागरिकांनी 2015 मध्ये तक्रारी केल्या होत्या. त्यातच तळ्यावरील एका लाडक्या चेतकाने पत्राची मागणी केल्याने ते पत्र दिले. या पत्रामुळे विसर्जनास बंदी घातली नसून उच्च न्यायालयात तुमच्या दोन चमको नगरसेवकांनी सभेच्या मंजुरीशिवाय तत्कालीन मुख्याधिकार्यांना प्रतिज्ञापत्र भाग द्यायला भाग पाडल्यानेच बंदी घातली. याचे आत्मचिंतन करून आमदारांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन मगच बेताल आरोप करावेत.

आमच्या पत्राने ती बंदी घातली असेल तर ती बंदी उठली पाहिजे. पण तसे जिल्हा प्रशासन करीत नाही, याचाच अर्थ पत्रामुळे नाही तर उच्च न्यायालयातील मुख्याधिकार्यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे बंदी घातली आहे, हे आमदारांना समजलेले नाही. दुटप्पी भूमिका घ्यायची असती तर पत्राचा उल्लेख यापूर्वी केला नसता. आमच्यावर दुटप्पीपणाचा आरोप करणार्या आमदारांचे अज्ञान आणि बालिशपणा जनतेसमोर उघड झाला आहे. आमदारांनी पत्रांचा अर्थ लावून घेण्याकरिता चांगली शिकवणी लावणे गरजेचे आहे, असेही खा. उदयनराजेंनी म्हटले आहे.