बांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात

पिंपरी -चिंचवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम साईट्सवरच अडकले आहेत.या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आज 19 वाहनांतून 95 साईट्सवरील 15 हजार 869 मजुरांना भोजन उपलब्ध करुन देण्यात आले. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामगार विभागाच्या मदतीने ही सोय केली.

‘क्रेडाई’ या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तसेच बांधकाम मंडळाकडे नोंद असलेल्या मजुरांना अटल आहार योजनेंतर्गत माध्यान्ह भोजन देण्याची योजना आहे. या योजनेनुसार जिल्हाधिकारी राम यांच्या निर्देशानुसार बांधकाम साईट्सवरील सर्वच मजुरांना भोजन देण्यात येत आहे. ही संख्या 30 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजनाची सोय करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या शहरांत बांधकामाच्या ठिकाणी अडकलेल्या बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आढावा. नोंदणीस अधीन राहून नोंदीत व अनोंदीत अशा सर्व कामगारांकरिता तातडीने मध्यान्ह भोजन देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

त्याचप्रमाणे, बहुतांश बांधकाम कामगार हे विविध जिल्ह्यांतील आणि परराज्यातील असल्याने व वाहतूक व्यवस्थेअभावी त्यांना गावी जाता येत नाही. ही बाब लक्षात घेता नोंदीत व अनोंदीत कामगारांची नोंदणीस अधीन राहून मध्यान्ह भोजना व्यवस्था तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली आहे.