लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, धनंजय मुंडेंचे आवाहन

dhananjay munde

बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे सातशेच्या पार गेलेत. दिवसागणिक वाढणारी ही संख्या चिंताजनक आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकर लसीकरण करून घ्यावे. ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत, असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून धनंजय मुंडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढत आहे. ही रुग्णसंख्या विचारात घेतली असता ऑक्सिजन/व्हेंटिलेटर्स उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन सिलिंडर याची कमतरता भासणार नाही, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु, या सगळ्या प्रयत्नांना जिल्ह्याच्या जनतेने नियमांचे पालन करून व काळजी घेऊन सहकार्य करणे व प्रशासनास पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.