शिवना नदी पात्रात वाळू माफीया व गावकऱ्यांमध्ये ‘सिनेस्टाईल’ हाणामारी

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील लाखणी व कन्नड तालुक्यातील देवळी येथील हद्दीच्या वादावरून शिवना नदीच्या पात्रात वाळू माफीया व गावकऱ्यांमध्ये सोमवारी (दि.५) सायंकाळी जोरदार दगडफेक व हाणामारी झाली यानंतर वाळू तस्कराकडून गावकऱ्यांवर चाकू हल्लाही झाला. यामध्ये लाखणी येथील गावकरी जख्मी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी गावात जाऊन हल्यात जखमी झालेल्या गावकऱ्यांची विचारपूस केली. दरम्यान वाळू तस्कराच्या गाड्या चाळीस फुट खोल नदीच्या पात्रात अपघातग्रस्त स्वरूपात दिसून आल्या आहेत. या गाड्या नक्की कुणी ढकलल्या हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. जालींदर बेलेकर सुभाष कदम, ज्ञानेश्वर कदम, रवींद्र कदम, रमेश कदम, बापुसाहेब कदम हि जख्मी झालेल्या गावकऱ्यांची नावे आहेत.

सोमवारी दुपारी वैजापूर तहसीलदार राहूल गायकवाड, नायब तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, संजय वारकड यांनी घटनास्थळी येऊन नदीपात्रातील परीस्थितीची पाहणी केली. नदी पात्राचे मोजमाप करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे गावकऱ्यांना आश्वासन दिले.

घटनेचे गांभीर्य ओळखून शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश शेळके, देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहेर यांच्या फौजफाट्यासह दंगा काबूचे पथक एक पथक रात्रंदिवस या ठिकाणी तळ ठोकून होते.

दरम्यान जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत नदीपात्रातून कुणालाही वाळू उपसा करु दिला जाणार नाही. असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या