चाकणकर यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करून चित्राताईंनी मत्सरी मानसिकता दाखवली-मनिषा कायंदे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावरुन सध्या चांगलंच राजकारण रंगताना दिसत आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका असे म्हटले आहे. वाघ यांनी यात कोणाचेही नाव घेतलेले नाहीये. मात्र, त्याचा रोख कुणाकडे आहे हे लक्षात येतेय. त्यामुळे यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

दरम्यान, या वक्तव्यावरून शिवसेनेच्या प्रवक्या मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, ‘एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. खरे तर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले आहे. चित्राताई वाघ यांना एखादे मानाचे पद मिळाले तर आम्ही त्यांचे अभिनंदन केले असते, असे कायंदे म्हणाल्या.

चित्रा वाघ यांच्या या ट्विटवर रुपाली चाकणकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी चाकणकर यांना या टि्वटबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ यांच्या ट्विटबद्दल मला काही बोलायचं नाही. तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची कुठलीच कल्पना नाही असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं चाकणकर म्हणाल्या. संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून उत्तम रित्या काम चालू आहे. मनाला समधान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या