‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’

devendra fadnavis and darekar

पुणे : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली होती. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे कोकणासह सांगली, कोल्हापूर, सातारा यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. तर लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

३-४ दिवस कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतल्यानंतर पूर स्थिती ओसरू लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते देखील दौरे करून झालेल्या नुकसानीचा आढावा व समस्या जाणून घेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गावातील नागरिकांची येथील शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे. फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी गावकऱ्यांसोबतच एकत्र बसून जेवण देखील केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं. दरम्यान, गावकऱ्यांसह दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांशी या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

दरम्यान, याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून दोन्ही नेत्यांचे कौतुक करतानाच महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहिर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास…खरच चित्रं खुप बोलकी असतात…’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या