स्वतः शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचं ट्रेंड राजकारणात सुरु झालाय; चित्रा वाघ यांचा घणाघात

chitra wagh

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातआरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.

हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समाजाला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असं देखील संजय राठोड म्हणाले आहेत.

संजय राठोड यांच्या खुलास्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘गुन्हेगाराला जात नसते. पोहरादेवीच्या दर्शनाला जाऊन त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. स्वतः शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचं राजकारण राठोडांकडून केला जात आहे,’ अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. राठोडांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, सरकार त्यांना पाठिवशी घालण्याचं काम करत आहे. ऑडिओ क्लिप्स मधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे हे शेंबडं पोरगं देखील सांगू शकतो. पुणे पोलिसांचा तपास हा संशय निर्माण करत आहे,’ असं भाष्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या